Wednesday, October 18, 2006

रणी फडकती लाखो झेंडे अरुणाचा अवतार महा





















रणी फडकती लाखो झेंडे अरुणाचा अवतार महा
विजयश्रीला श्री विष्णूंपरी भगवा झेंडा एकची हा || धृ. ||

शिवरायांच्या दृढ वज्राची सह्याद्रीच्या हृदयाची
दर्या खवळे तिळभर न ढळे कणखर काठी झेंड्याची
तलवारीच्या धारेवरती पंचप्राणा नाचविता
पाश पटापट तुटती त्यांचे खेळे पट झेंड्यावरचा
लीलेने खंजीर खुपसता मोहक मायेच्या हृदयी
अखंड रुधीरांच्या धारांनी ध्वज सगळा भगवा होइ
अधर्म लाथेने तुडवी धर्माला गगनी चढवी
राम रणांगणी मग दावी !!! || १ ||

कधी न केले निजमुख काळे पाठ दावुनी शत्रुला
कृष्ण कारणी क्षणही न रणी धर्माचा हा ध्वज दिसला
चोच मारण्या परव्रणावर काकापरी नच फडफडला
जणु जटायु रावणमार्गी उलट रणांगणी हा ठेला
परलक्ष्मीला पळवायाला पळभर पदर न हा पसरे
श्वासाश्वासासह सत्याचे संचरती जगती वारे
गगनमंदिरी धाव करी मलीन मृत्तिका लव न धरी
नभराजाचा गर्व हरी ... || २ ||

मुरारबाजी करी कारंजी पुरंदरावर रुधिरांची
झुकली कुठली दौलत झाली धर्माच्या ध्वजराजाची
संभाजीच्या हृदयी खवळे राष्ट्रप्रेमाचे पाणी
अमर तयांच्या छटा झळकती निधड्या छातीची वाणी
खंडोजी कुरवंडी कन्या प्रेमे प्रभुचरणावरुनी
स्वामी भक्ती चे तेज अतुल ते चमकत राहे ध्वज गगनी
हे सिंहासन निष्ठेचे हे नंदनवन देवांचे
मूर्तीमंत हा हरी नाचे ... || ३ ||

स्मशानातल्या दिव्य महाली निजनाथासह पतीव्रता
सौभाग्याची सीमा नुरली उजळायाला या जगता
रमा-माधवा सवे पोचता गगनांतरी जळत्या ज्योती
चिन्मंगल ही चिता झळकते ह्या भगव्या झेंड्यावरती
नसूनी असणे मरूनी जगणे राख होउनी पालविणे
जीवाभावाच्या जादुच्या ह्या ध्वजराजाला हे लेणे
संसाराचा अंत इथे मोहाची क्षणी गाठ तुटे
धुके फिटे नव विश्व उठे ... || ४ ||

या झेंड्याचे हे आवाहन महादेव हरहर बोला

(हर हर महादेव !!!)

उठा मराठे अंधारावर घाव निशणीचा घाला
वीज कडाडुनी पडता भुईवर कंपित हृदयांतरी होती
टक्कर देता पत्थर फुटती डोंगर मातीला मिळती
झंजावाता पोटी येउनी पान हलेना हाताने
कलंक असला धुवूनी काढणे शिवरायाच्या राष्ट्राने
घनचक्कर या युद्धात व्हा राष्ट्राचे राउत
कर्तृत्वाचा द्या हात ... || ५ ||


---

Tuesday, October 17, 2006

वेडात मराठे वीर दौडले सात

स्वराज्याचे सरनौबत प्रतापराव गुजर आणि महाराज यांच्यातील ऐतिहासिक सत्य प्रसंगावर आधारित कुसुमाग्रजांनी रचलेली ही कविता मंगेशकर कुटुंबियांनी स्वरबद्ध करुन अजरामर केली आहे.

कुसुमावली वर ही कविता वाचनासाठी उपलब्ध आहेच, पण तिथे ती चित्र स्वरूपात असल्यामुळे गुगल ईत्यादी शोधयंत्रांद्वारे ती सापडत नाही, म्हणून परत ब्लॉ़ग करण्याचा निर्णय घेतला.


सात
वेडात मराठे वीर दौडले सात !













"श्रुती धन्य जाहल्या श्रवुनी आपुली वार्ता
रण सोडुनि सेनासागर अमुचे पळता
अबलाही घरोघर खर्या लाजतिल आता
भर दिवसा आम्हा दिसु लागली रात" || -३ ||

ते कठोर अक्षर एक एक त्यातील
जाळीत चालले कणखर ताठर दील
"माघारी वळणे नाही मराठी शील
विसरला महाशय काय लावता जात" || -२ ||


वर भिवयी चढली दात दाबिती ओठ
छातीवर तुटली पटबंधाची गाठ
डोळ्यात उठे काहूर ओलवे काठ
म्यानातुन उसळे तलवारीची पात,
वेडात मराठे वीर दौडले सात || -१||

(संगीतिकेमधे यापुधील कडवीच फक्त घेतली आहेत)

म्यानातुन उसळे तलवारीची पात,
वेडात मराठे वीर दौडले सात || धृ. ||

ते फिरता बाजुस डोळे, किंचित ओले
सरदार सहा सरसावुन उठले शेले
रिकीबीत टाकले पाय झेलले भाले
उसळले धुळीचे मेघ सात निमीषात || १ ||

आश्चर्यमुग्ध टाकुन मागुती सेना
अपमान बुजवण्या सात अर्पुनी माना
छानणीत शिरले थेट भेट गनिमांना
कोसळल्या उल्का जळत सात दर्यात || २ ||

खालुन आग वर आग आग बाजूनी
समशेर उसळली सहस्र क्रुर ईमानी
गर्दीत लोपले सात जीव ते मानी
खग सात जळाले अभिमानी वणव्यात || ३ ||

दगडांवर दिसतिल अजुनी तेथल्या टापा
ओढ्यात तरंगे अजुनी रंग रक्ताचा
क्षितिजावर दिसतो अजुनी मेघ मातीचा
अद्याप विराणी कुणी वार्यावर गात .... || ४ ||

वेडात मराठे वीर दौडले सात

---

ह्या कवितेबरोबरच टेनिसनची "द चार्ज ऑफ द लाईट ब्रिगेड" पण आठवते.

Monday, October 16, 2006

कुसुमाग्रजांच्या दोन कविता - झाड आणि मौन

पहिली कविता "मुक्तायन" कवितासंग्रहाच्या दुसर्या पानावर आहे, आणि दुसरी
चाळिसाव्या पानावर. दोन्ही तश्या वेगळ्या आहेत, पण तरी दोघींमधे एक विशेष
दुवा मला जाणवतो.

झाड

तूच पाऊस
तूच ऊन

मी फक्त एक झाड
आकाशात चिणलेलं

तुझं पाऊसपण
तुझं ऊनपण
तुझं वादळपण

अंगावर घेता घेता
शिणलेलं.


मौन

शिणलेल्या झाडापाशी
कोकिळा आली
म्हणाली, गाणं गाऊ का ?
झाड बोललं नाही
कोकिळा उडून गेली.

शिणलेल्या झाडापाशी
कोकिळा आली
म्हणाली, गाणं गाऊ का ?
झाड बोललं नाही
कोकिळा उडून गेली.

शिणलेल्या झाडापाशी
सुग्रण आली
म्हणाली, घरटं बांधु का ?
झाड बोललं नाही
सुग्रण निघून गेली.

शिणलेल्या झाडापाशी
चंद्रकोर आली
म्हणाली, जाळीत लपु का ?
झाड बोललं नाही
चंद्रकोर मार्गस्थ झाली.

शिणलेल्या झाडापाशी
बिजली आली
म्हणाली, मिठीत येऊ का ?
झाडाचं मौन सुटलं
अंगाअंगातुन
होकारांच तुफान उठलं.


ह्या कवितेतला "शिणलेला" हा शब्द नजरेआड केला तर ही कविता मला जास्ती आवडेल कदाचित .

Saturday, October 14, 2006

केसरी गुहेसमीप मत्त हत्ती चालला ...

दुंदुभी निनादल्या, नौबती कडाडल्या, दशदिशा थरारल्या,
केसरी गुहेसमीप मत्त हत्ती चालला, मत्त हत्ती चालला ||धृ.||

वाकुनी अदिलशहास कुर्निसात देवुनी,
प्रलयकाल तो प्रचंड खान निघे तेथुनी ,
हादरली धरणि व्योम शेषही शहारला ||१||

खान चालला पुढे, अफाट सैन्य मागुती,
उंट, हत्ती, पालख्याही रांग लांब लांब ती !
टोळधाड ही निघे स्वतंत्रता गिळायला ||२||

तुळजापुरची भवानी माय महान मंगला,
राउळात आदमखान दैत्यासह पोचला,
मूर्ती भंगली मनात चित्रगुप्त हासला ||3||

श्रवणी तप्त तैल से शिवास वॄत पोहोचले,
रक्त तापले करात खडग सिध्द जाहले,
देउनी बळी अदास तोशवी भवानीला ||४||

सावधान हो शिवा !! वैर्याची रात्र ही !!
काळ येतसे समीप, साध तूच वेळ ही,
मर्दण्यास कालियास कृष्ण सज्ज जाहला ||५||

केसरी गुहेसमीप, मत्त हत्ती मारला, मत्त हत्ती मारला









अफझलखान अफाट फौजफाटा घेउन जेंव्हा स्वराज्यावर चालुन आला त्या प्रसंगावर आधारित हे महान पद्य.

जेवढे आठवले आणि मिळाले तेवढे लिहीले आहे,
जर कुणाला अजून कडवी माहीत असतिल तर कृपया सांगा !