Wednesday, October 26, 2022

एक पत्र तुकोबांना - वसंत बापट

तुकोबांच्या पायी | माझे दंडवत
ऐसा मोठा आप्त | नाही दुजा
स्वप्नी त्यांची मूर्ती |  जागृती की निज 
तुकाराम बीज | सण आम्हा
तुकोबा माझीया | ओढाळ मनात
आली अकस्मात | कल्पना ही -
रूप पालटून | सदेह विमानी
लोहगावातूनी | पुन्हा यावे
कासेची लंगोटी | ज्याला तुम्ही द्यावी
ऐसा भला गावी । नाही कोणी ...
नाठाळांचा झाला । जगात सुकाळ
हाती तिन्ही काळ । काठी हवी
युगपालटले । आता नका होऊ
मेणाहुनी मऊ । विष्णुदास
कठीण वज्राला । भेदण्याची शक्ती
तीच आता भक्ती । विठ्ठलाची ..
आता वाण नाही । पुंड आणि गुंडा
तिन्ही लोकी झेंडा । नाचे त्यांचा
दांभिक वंचक । मूर्तिमंत पिडा
आता त्यांना । धडा शिकवावा
तुम्ही सांगितला । वैष्णवांचा धर्म
भेदाभेद भ्रम । अमंगळ
आता अवघेची ।  पाईक भेदांचे
आधार वेदांचे । देती आम्हा ..
तुकोबा तुकोबा । दावा संतपण
पायींची वहाण । हाती बरी !

0 Comments:

Post a Comment

<< Home