प्रयत्ने वाळूचे कण रगडीता तेलही गळे |
तृषार्ताची तृष्णा मृगजळ पिऊनही वितळे ||
सशाला दिसे विपिन फिरता शृंगही जरी |
परंतु मूर्खाचे हृदय धरवेना क्षणभरी ||
जी.ए. कुलकर्णी यांच्या "
माणसे: अरभाट आणि चिल्लर" ह्या आत्मवृत्तात ह्या रचनेबद्दल हा वेगळा उतारा वाचनात आला आणि प्रकर्षानी आठवण झाली ..
एकदा सडेकर मास्तरांनी निबंधाला विषय दिला : "प्रयत्ने वाळूचे कण रगडिता..." रात्री उशीरापर्यंत जागून मी निबंध लिहिला. प्रयत्न केला तर सारे काही साध्य होते, प्रयत्न हाच परमेश्वर; 'उद्योगाच्या घरी ऋद्धी सिद्धी पाणी भरी'... इत्यादी, औषधाच्या बाटलीबरोबर माहितीचा कागद असतो, त्याप्रमाणे या विषयाबाबतचे हे नेहमीचे भरण अगदी मराठी चौथीपासून आमच्या जवळ तयार असे. त्याच विषयावर आम्ही यापूर्वी दोनदा लिहिले देखील होते. परंतु या खेपेला माझे मनच उफराटे झाले होते की काय कुणास ठाऊक, या खेपेला मी एक वेगळाच निबंध लिहिला : "प्रयत्ने वाळूचे कण-" या ओळीचा अर्थ प्रयत्नाने सारे काही साध्य होते, असा मुळीच नाही. माणूस जन्मभर जरी रगडत बसला तरी वाळूच्या कणांवर थेंबभर देखील तेल गळणार नाही. या ठिकाणी कवी पूर्णपणे अशक्य अशा गोष्टींची उदाहरणे देत आहे. मृगजळाने तहानलेल्या माणसाची (एखाद्या वेळी) तहान भागेल, रानात सशाचे शिंग सापडू शकेल, वाळूच्या कणांतून तेलाचा थेंब गळू शकेल, पण मूर्खाचे हृदय मात्र कधीही धरता येणार नाही. म्हणून ही ओळ प्रयत्नांची स्तुती करणारी मुळीच नाही. कुणी तरी असला खुळचट अर्थ डोक्यात घेतला व त्याची परंपरा होऊन बसली. एखाद्या पुजाऱ्याला पूजा करताना शिंक यावी व ते पाहून पूजेच्या सुरुवातीला शिंकलेच पाहिजे असा क्रम निर्माण व्हावा, तसे या ओळीबद्दल झाले आहे." ...
मनोगतावरून साभार ..