Thursday, October 20, 2011

आज पुन्हा तलवार भवानी म्यानातून निघाली !!! जय भवानी !! जय शिवाजी !!

आज पुन्हा तलवार भवानी म्यानातून निघाली !

पिवळ्या खलसर्पाने केला गोष्टींचा देखावा
गल्यत घालून हात साधला क्रूर अपुला कावा
या अधमाचा भ्याड धर्म का शब्दाला जागावा
आज उठे गरूडाची सेना सर्पाना निर्धानी ||||
आज पुन्हा......

विन्ध्य हिमाचल यमुना गंगा सर्व पतली राने
गर्जत हरहर समुद्र उठले पेटूनिया त्वेषाने
रक्ताच्या अक्षराने लिहली इतिहासाची पाने
मर्दांची मनगटे जाहली जळत्या वज्र मशाली ||||
आज पुन्हा......

उदो उदो जगदम्बे आता लव तुजा अंगारा
वीर निघाले संसारावरी ठेवुनी याचा निखारा
प्राणाचा नैवेद्य अर्प तुझ घे रक्ताच्या धारा
उदो उदो जगदम्बे आई गाड शत्रु पाताळी||||
आज पुन्हा......

Sunday, April 25, 2010

रायगडा चा माथ्या वारुनी आज उठे ललकार


रायगडा चा माथ्या वारुनी आज उठे ललकार,
सिन्हासानि शिवराय बैसले (२)

Friday, July 18, 2008

तो ( नास्तिक ?)

तो

दिवाणखान्यात बसून
चारचौघांच्या संगतीत
मी जेव्हा तुझे अस्तित्व नाकारतो
तेव्हा आकाशाचे एक दार
किलकिले करून
तू पाहतोस माझ्याकडे कौतुकाने
कुतुहलानेही,
आणि सगळे निघून गेल्यावर
तार्याच्या अंधुक प्रकाशात
तू उतरतोस माझ्या एकांतात
आणि समोरच्य़ा खुर्चीत बसून
म्हणतोस - अभिनन्दन
तुझे विवेचन छानच होते
इतके की मलाही शंका आली
माझ्या अस्तित्वाची -
पण तरिही मला माहीत आहे
मला मानणार्यांमधे
तू अग्रेसर आहेस
फक्त तुझा दिवाणखाना
तुझ्या काळजापासून
फार दूर आहे, ईतकेच.

-कुसुमाग्रज (मुक्तायन, पान ४५)

हाडांचे सापळे

हाडांचे सापळे हासती
झडणार्या मासांस पाहुनी;
किती लपविले तरी
दातांचे दिसणारंच पाणी.

पहा विचारुनि त्यांना कसली
मैथुनात रे असते झिंग;
दाखवितिल ते भोक रिकामे
जिथे असावे मांसल लिंग.

पहा टाकुनी प्रश्न काय वा
निशाण तुमच्या हो बुद्धीचे;
घुमेल डमरुतुन डोक्यांच्या
हास्य वाळलेल्या मज्जांचे.

अखेर होतां, किती विशाल
पुसेल कुणि जर त्यांचे अंगण;
दिसेल थोडें सफेद कांही,
जिथे असावे मांसल ढुंगण.

असशिल भोळ्या कुठे भैरवा,
उघड तुझे तर तिनही डोळे;
भस्म करी गा अता तरी हे ---
हे हाडांचे खडे सापळे !

-बा. सी. मर्ढेकर

Thursday, July 17, 2008

प्रयत्ने वाळूचे कण रगडीता तेलही गळे

प्रयत्ने वाळूचे कण रगडीता तेलही गळे |
तृषार्ताची तृष्णा मृगजळ पिऊनही वितळे ||
सशाला दिसे विपिन फिरता शृंगही जरी |
परंतु मूर्खाचे हृदय धरवेना क्षणभरी ||

जी.ए. कुलकर्णी यांच्या "माणसे: अरभाट आणि चिल्लर" ह्या आत्मवृत्तात ह्या रचनेबद्दल हा वेगळा उतारा वाचनात आला आणि प्रकर्षानी आठवण झाली ..

एकदा सडेकर मास्तरांनी निबंधाला विषय दिला : "प्रयत्ने वाळूचे कण रगडिता..." रात्री उशीरापर्यंत जागून मी निबंध लिहिला. प्रयत्न केला तर सारे काही साध्य होते, प्रयत्न हाच परमेश्वर; 'उद्योगाच्या घरी ऋद्धी सिद्धी पाणी भरी'... इत्यादी, औषधाच्या बाटलीबरोबर माहितीचा कागद असतो, त्याप्रमाणे या विषयाबाबतचे हे नेहमीचे भरण अगदी मराठी चौथीपासून आमच्या जवळ तयार असे. त्याच विषयावर आम्ही यापूर्वी दोनदा लिहिले देखील होते. परंतु या खेपेला माझे मनच उफराटे झाले होते की काय कुणास ठाऊक, या खेपेला मी एक वेगळाच निबंध लिहिला : "प्रयत्ने वाळूचे कण-" या ओळीचा अर्थ प्रयत्नाने सारे काही साध्य होते, असा मुळीच नाही. माणूस जन्मभर जरी रगडत बसला तरी वाळूच्या कणांवर थेंबभर देखील तेल गळणार नाही. या ठिकाणी कवी पूर्णपणे अशक्य अशा गोष्टींची उदाहरणे देत आहे. मृगजळाने तहानलेल्या माणसाची (एखाद्या वेळी) तहान भागेल, रानात सशाचे शिंग सापडू शकेल, वाळूच्या कणांतून तेलाचा थेंब गळू शकेल, पण मूर्खाचे हृदय मात्र कधीही धरता येणार नाही. म्हणून ही ओळ प्रयत्नांची स्तुती करणारी मुळीच नाही. कुणी तरी असला खुळचट अर्थ डोक्यात घेतला व त्याची परंपरा होऊन बसली. एखाद्या पुजाऱ्याला पूजा करताना शिंक यावी व ते पाहून पूजेच्या सुरुवातीला शिंकलेच पाहिजे असा क्रम निर्माण व्हावा, तसे या ओळीबद्दल झाले आहे." ...

मनोगतावरून साभार ..

Thursday, August 16, 2007

आजीच्या जवळी घड्याळ कसले


आजीच्या जवळी घड्याळ कसले आहे चमत्कारिक,
देई ठेवुनि तें कुठे अजुनि हे नाही कुणा ठाउक;
त्याची टिक टिक चालते न कधिही, आहे मुके वाटते,
किल्ली देई न त्यास ती कधि, तरी ते सारखे चालते

"अभ्यासास उठीव आज मजला आजी पहाटे तरी,"
जेव्हा मी तिज सांगुनी निजतसे रात्री बिछान्यावरी
साडेपाचही वाजतात न कुठे तो हाक ये नेमकी
"बाळा झांजर जाहले, अरवला तो कोंबडा, उठ की !"

ताईची करण्यास जम्मत, तसे बाबूसवे भांडता
जाई संपुनियां सकाळ न मुळी पत्ता कधी लागता !
"आली ओटिवरी उन्हे बघ!" म्हणे आजी, "दहा वाजले !
जा जा लौकर !" कानि तो घणघणा घंटाध्वनी आदळे.

खेळाच्या अगदी भरांत गढुनी जाता अम्ही अंगणी
हो केव्हा तिनिसांज ते न समजे ! आजी परी आंतुनी
बोले, "खेळ पुरे, घरांत परता ! झाली दिवेलागण,
ओळीने बसुनी म्हणा परवचा ओटीवरी येउन !"

आजीला बिलगून ऐकत बसू जेव्हा भुतांच्या कथा
जाई झोप उडून, रात्र किती हो ध्यानी न ये ऐकता !
"अर्धी रात्र कि रे" म्हणे उलटली, "गोष्टी पुरे ! जा पडा !'
लागे तो धिडधांग पर्वतिवरी वाजावया चौघडा

सांगे वेळ, तशाच वार-तिथीही आजी घड्याळातुनी
थंडी पाऊस ऊनही कळतसे सारें तिला त्यांतुनी
मौजेचे असले घड्याळ दडुनी कोठे तिने ठेविले?
गाठोडे फडताळ शोधुनि तिचे आलो ! तरी ना मिळे !

- केशवकुमार

Sunday, March 04, 2007

निष्पर्ण तरूंची राई


भय इथले संपत नाही मज तुझी आठवण येते
मी संध्याकाळी गातो तू मला शिकविली गीते
ते झरे चंद्रसजणांचे ती धरती भगवी माया
झाडांशी निजलो आपण झाडात पुन्हा उगवाया
त्या वेली नाजुक भोळ्या वार्याला हसवुन पळती
क्षितिजांचे तोरण घेऊन दारावर आली भरती
तो बोल मंद हळवासा आयुष्य स्पर्शुनी गेला
सीतेच्या वनवासातिल जणु अंगी राघवशेलादेऊळ पलिकडे तरिही तुज ओंजळ फुटला खांब
थरथरत्या बुबुळांपाशी मी उरला सुरला थेंब
संध्येतिल कमळफुलासम मी नटलो शृंगाराने
देहाच्याभवती रिंगण घालती निळाइत राने
स्तोत्रात इंद्रिये अवघी गुणगुणती दुःख कुणाचे
हे सरता संपत नाही चांदणे तुझ्या स्मरणाचे
ते धुके अवेळी होते की परतायाची घाई
मेंदूतुन ढळली माझ्या निष्पर्ण तरूंची राई

-ग्रेस

Wednesday, October 18, 2006

रणी फडकती लाखो झेंडे अरुणाचा अवतार महा

रणी फडकती लाखो झेंडे अरुणाचा अवतार महा
विजयश्रीला श्री विष्णूंपरी भगवा झेंडा एकची हा || धृ. ||

शिवरायांच्या दृढ वज्राची सह्याद्रीच्या हृदयाची
दर्या खवळे तिळभर न ढळे कणखर काठी झेंड्याची
तलवारीच्या धारेवरती पंचप्राणा नाचविता
पाश पटापट तुटती त्यांचे खेळे पट झेंड्यावरचा
लीलेने खंजीर खुपसता मोहक मायेच्या हृदयी
अखंड रुधीरांच्या धारांनी ध्वज सगळा भगवा होइ
अधर्म लाथेने तुडवी धर्माला गगनी चढवी
राम रणांगणी मग दावी !!! || १ ||

कधी न केले निजमुख काळे पाठ दावुनी शत्रुला
कृष्ण कारणी क्षणही न रणी धर्माचा हा ध्वज दिसला
चोच मारण्या परव्रणावर काकापरी नच फडफडला
जणु जटायु रावणमार्गी उलट रणांगणी हा ठेला
परलक्ष्मीला पळवायाला पळभर पदर न हा पसरे
श्वासाश्वासासह सत्याचे संचरती जगती वारे
गगनमंदिरी धाव करी मलीन मृत्तिका लव न धरी
नभराजाचा गर्व हरी ... || २ ||

मुरारबाजी करी कारंजी पुरंदरावर रुधिरांची
झुकली कुठली दौलत झाली धर्माच्या ध्वजराजाची
संभाजीच्या हृदयी खवळे राष्ट्रप्रेमाचे पाणी
अमर तयांच्या छटा झळकती निधड्या छातीची वाणी
खंडोजी कुरवंडी कन्या प्रेमे प्रभुचरणावरुनी
स्वामी भक्ती चे तेज अतुल ते चमकत राहे ध्वज गगनी
हे सिंहासन निष्ठेचे हे नंदनवन देवांचे
मूर्तीमंत हा हरी नाचे ... || ३ ||

स्मशानातल्या दिव्य महाली निजनाथासह पतीव्रता
सौभाग्याची सीमा नुरली उजळायाला या जगता
रमा-माधवा सवे पोचता गगनांतरी जळत्या ज्योती
चिन्मंगल ही चिता झळकते ह्या भगव्या झेंड्यावरती
नसूनी असणे मरूनी जगणे राख होउनी पालविणे
जीवाभावाच्या जादुच्या ह्या ध्वजराजाला हे लेणे
संसाराचा अंत इथे मोहाची क्षणी गाठ तुटे
धुके फिटे नव विश्व उठे ... || ४ ||

या झेंड्याचे हे आवाहन महादेव हरहर बोला

(हर हर महादेव !!!)

उठा मराठे अंधारावर घाव निशणीचा घाला
वीज कडाडुनी पडता भुईवर कंपित हृदयांतरी होती
टक्कर देता पत्थर फुटती डोंगर मातीला मिळती
झंजावाता पोटी येउनी पान हलेना हाताने
कलंक असला धुवूनी काढणे शिवरायाच्या राष्ट्राने
घनचक्कर या युद्धात व्हा राष्ट्राचे राउत
कर्तृत्वाचा द्या हात ... || ५ ||


---