तो ( नास्तिक ?)
तो
दिवाणखान्यात बसून
चारचौघांच्या संगतीत
मी जेव्हा तुझे अस्तित्व नाकारतो
तेव्हा आकाशाचे एक दार
किलकिले करून
तू पाहतोस माझ्याकडे कौतुकाने
कुतुहलानेही,
आणि सगळे निघून गेल्यावर
तार्याच्या अंधुक प्रकाशात
तू उतरतोस माझ्या एकांतात
आणि समोरच्य़ा खुर्चीत बसून
म्हणतोस - अभिनन्दन
तुझे विवेचन छानच होते
इतके की मलाही शंका आली
माझ्या अस्तित्वाची -
पण तरिही मला माहीत आहे
मला मानणार्यांमधे
तू अग्रेसर आहेस
फक्त तुझा दिवाणखाना
तुझ्या काळजापासून
फार दूर आहे, ईतकेच.
-कुसुमाग्रज (मुक्तायन, पान ४५)

1 Comments:
तो कोण आहे? काही तर्क??
Post a Comment
<< Home