Friday, July 18, 2008

हाडांचे सापळे

हाडांचे सापळे हासती
झडणार्या मासांस पाहुनी;
किती लपविले तरी
दातांचे दिसणारंच पाणी.

पहा विचारुनि त्यांना कसली
मैथुनात रे असते झिंग;
दाखवितिल ते भोक रिकामे
जिथे असावे मांसल लिंग.

पहा टाकुनी प्रश्न काय वा
निशाण तुमच्या हो बुद्धीचे;
घुमेल डमरुतुन डोक्यांच्या
हास्य वाळलेल्या मज्जांचे.

अखेर होतां, किती विशाल
पुसेल कुणि जर त्यांचे अंगण;
दिसेल थोडें सफेद कांही,
जिथे असावे मांसल ढुंगण.

असशिल भोळ्या कुठे भैरवा,
उघड तुझे तर तिनही डोळे;
भस्म करी गा अता तरी हे ---
हे हाडांचे खडे सापळे !

-बा. सी. मर्ढेकर

2 Comments:

At 4:04 AM, Blogger शिरीष गानू said...

ही कविता कुठे सापडली?? मी बर्याच दिवसांपूर्वी वाचली होती.. तेव्हा हसू आले.. (अजूनही आले)पण, अता जरा वेगळा अर्थ ध्यानात आला.. अश्या अवस्थेला का पोचावे?? भैरवाला स्वत:ला भस्म करून टाकण्याची विनंती करावी!!

 
At 9:44 PM, Blogger धनंजय देव said...

गेल्या वेळी भारतात आलो होतो तेंव्हा मर्ढेकरांची कविता नावाचे पुस्तक घेउन आलो होतो.

 

Post a Comment

<< Home