Tuesday, October 17, 2006

वेडात मराठे वीर दौडले सात

स्वराज्याचे सरनौबत प्रतापराव गुजर आणि महाराज यांच्यातील ऐतिहासिक सत्य प्रसंगावर आधारित कुसुमाग्रजांनी रचलेली ही कविता मंगेशकर कुटुंबियांनी स्वरबद्ध करुन अजरामर केली आहे.

कुसुमावली वर ही कविता वाचनासाठी उपलब्ध आहेच, पण तिथे ती चित्र स्वरूपात असल्यामुळे गुगल ईत्यादी शोधयंत्रांद्वारे ती सापडत नाही, म्हणून परत ब्लॉ़ग करण्याचा निर्णय घेतला.


सात
वेडात मराठे वीर दौडले सात !













"श्रुती धन्य जाहल्या श्रवुनी आपुली वार्ता
रण सोडुनि सेनासागर अमुचे पळता
अबलाही घरोघर खर्या लाजतिल आता
भर दिवसा आम्हा दिसु लागली रात" || -३ ||

ते कठोर अक्षर एक एक त्यातील
जाळीत चालले कणखर ताठर दील
"माघारी वळणे नाही मराठी शील
विसरला महाशय काय लावता जात" || -२ ||


वर भिवयी चढली दात दाबिती ओठ
छातीवर तुटली पटबंधाची गाठ
डोळ्यात उठे काहूर ओलवे काठ
म्यानातुन उसळे तलवारीची पात,
वेडात मराठे वीर दौडले सात || -१||

(संगीतिकेमधे यापुधील कडवीच फक्त घेतली आहेत)

म्यानातुन उसळे तलवारीची पात,
वेडात मराठे वीर दौडले सात || धृ. ||

ते फिरता बाजुस डोळे, किंचित ओले
सरदार सहा सरसावुन उठले शेले
रिकीबीत टाकले पाय झेलले भाले
उसळले धुळीचे मेघ सात निमीषात || १ ||

आश्चर्यमुग्ध टाकुन मागुती सेना
अपमान बुजवण्या सात अर्पुनी माना
छानणीत शिरले थेट भेट गनिमांना
कोसळल्या उल्का जळत सात दर्यात || २ ||

खालुन आग वर आग आग बाजूनी
समशेर उसळली सहस्र क्रुर ईमानी
गर्दीत लोपले सात जीव ते मानी
खग सात जळाले अभिमानी वणव्यात || ३ ||

दगडांवर दिसतिल अजुनी तेथल्या टापा
ओढ्यात तरंगे अजुनी रंग रक्ताचा
क्षितिजावर दिसतो अजुनी मेघ मातीचा
अद्याप विराणी कुणी वार्यावर गात .... || ४ ||

वेडात मराठे वीर दौडले सात

---

ह्या कवितेबरोबरच टेनिसनची "द चार्ज ऑफ द लाईट ब्रिगेड" पण आठवते.

5 comments:

  1. ह्या गाण्याची mp3 तुमच्याकडे आहे काय? गेली ४ वर्षे शोधतोय :(

    ReplyDelete
  2. Nakkich ahe, email kalwa lagech pathavto !!

    ReplyDelete
  3. सुन्दर काम हाती घेतले आहे तुम्ही मदत हवी असेल तर नक्की करेन !!

    ReplyDelete
  4. धन्यवाद .... !!!!!

    ReplyDelete
  5. dhananjay , ase vede aata parat nirman zale pahijet . aaple kaam mothe aahe. thanks

    ReplyDelete